नमस्कार
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घराच्या छतावर चढून वीजेची चोरी करणाऱ्या एका व्यक्तीला कॅमेऱ्यात रंगेहाथ पकडल्यामुळे त्याची ती विजेची चोरी तर सर्वांना उघडकीला आलीच, मात्र त्याचा चेहऱ्यावरील हावभाव सुद्धा बघण्यासारखे झाले होते. वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आयडिया करून ही चोरी उघडकीला आणली. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं ? :- उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगरमध्ये वीज चोरी होत असल्याची तक्रार एका व्यक्तीने केली होती. तेव्हा त्या व्यक्तीच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील वीज मंडळाचे कर्मचारी त्या भागात पोहोचले.
ज्या घरातून वीज चोरी होत असावी, असा संशय होता, त्या घऱातून माहिती घेण्याचा आणि पाहणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र बेल वाजवून आणि हाका मारूनही त्या घराचं दार उघडलं न गेल्यामुळं वीज कर्मचाऱ्यांचा संशय अजूनच बळावला.
अशी लढवली कल्पना :- वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एक अनोखी युक्ती लढवली आणि त्यांच्यापैकी एक सदस्य हा शेजारच्या घराच्या छतावर गेला आणि इतर सर्वजण त्याच्या घरापाशीच उभे राहिले. या प्रकारामुळे बिथरलेली ती व्यक्ती आपली विजेची चोरी पकडली जाईल, म्हणून चोरलेल्या वीजेचं कनेक्शन तोडण्यासाठी छतावर आली.
छतावर पालथं पडून सरकत सरकत ही व्यक्ती वायरपर्यंत पोहोचली. आपल्या हातातील हातोडीनं ती वायर तोडण्याआधीच शेजारच्या छतावरून व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्याने त्याला आवाज दिला. आपली चोरी पकडली गेल्याचं लक्षात आल्यावर त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तो जसा आला, तसाच त्याच चतुराईने छतावरून मागे गेला. मात्र तोपर्यंत त्याची चोरी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. हा व्हिडिओ बघता बघता सगळीकडे पसरला आणि व्हायरल झाला.
वीजचोरीच्या वाढत्या घटना :- उत्तर प्रदेशात अशा प्रकारे चोरटी वीज वापरणाऱ्या अनेक घटना घडत असल्याचं दिसून आलं आहे. वारंवार तक्रारी करूनही हे प्रकार थांबत नसल्यामुळे आता वीज मंडळानं धाडस सत्र सुरू केलं आहे. वीजचोरी करणाऱ्यांविरोधात व्हिडिओच्या किंवा इतर माध्यमातून पुरावे गोळा करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येते. त्याचबरोबर दंडात्मक वसुली करण्याची योजना वीज मंडळाने तयार केल्याची माहिती आहे. यामुळे आता तरी वीजेची चोरी थांबेल, अशी अपेक्षा आहे.
बघा विडिओ