। नमस्कार ।
परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून तर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिमझिम सुरू आहेत. सर्वत्र होत असलेल्या या पावसामुळे, नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुरामध्ये वेगवेगळ्या दुर्घटना घडत असल्या समोर आलंय. काल सेलू तालुक्यातील कुपटा या गावात बैलजोडी पाण्यामध्ये वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील कुपटा गावात रस्ता ओलांडणारी एक बैलजोडी पूराच्या पाण्यात वाहून गेली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो.
बैलजोडी वाहून जातानाचा प्रकार ताजा असतानाच याच गावातील दोन युवक या पाण्यामधून रस्ता पार करतानाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असताना युवक या पाण्यामधील रस्ता पार करायला सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यभागी आल्यावर, प्रवाहाचा अंदाज आल्याने, या युवकांनी स्वतः नदीमध्ये उडी घेतली आणि काही अंतरावर पोहत जाऊन, स्वतःचा जीव वाचवला. परंतु अशा प्रकारचा स्टंट जीवावरही बेतू शकतो.
प्रशासनाकडून वारंवार, पूरपरिस्थिती मध्ये स्वतःचा बचाव करा, नदी नाल्यांना पार करू नका, अशा सूचना दिल्या जात असतानाही, जिल्ह्यात अशा घटना काही थांबायचे नाव घेत नाहीत. अशा प्रकारच्या धाडसामुळे जीवितहानी देखील होऊ शकते, यामुळे नागरिकांनी सतर्क होऊन स्वतःचं संरक्षण करणे गरजेचे आहे.
बघा विडिओ :-
परभणीत मुसळधार पावसात बैलजोडी गेली वाहून pic.twitter.com/FYmZ3FgR4u
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2021
सोर्स :- लोकमत